Neeraj Chopra Javelin Throw Final Match Live Streaming : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राकडे आज तमाम भारतीयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदक अपात्रतेमुळे हुकल्यानंतर मीराबाई चानूलाही अवघ्या एका किलोच्या फरकामुळे कांस्यपदकानं हुलकावणी दिली. त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकच्या उरलेल्या दिवसांमध्ये भारताला पदकाची आशा असणाऱ्या खेळाडूमध्ये नीरज चोप्राचा समावेश आहे. आज नीरज चोप्रा सुवर्णपदकाचा वेध घेण्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक करणार आहे. त्यानं केलेला सुवर्णवेध भारताच्या पदकांच्या संख्येत उल्लेखनीय भर घालणारा ठरेल.
टोक्यो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता :
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं सुवर्णवेध केल्यानंतर त्याच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यानंतर झालेल्या अनेक स्पर्धांमधून नीरज चोप्रानं लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदकाच्या जवळ पोहोचलेल्या नीरज चोप्रानं इतिहासाची पुनरावृत्ती करावी, अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत ८९.३४ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकाच्या शर्यतीत प्रवेश केला.
नीरज चोप्राचा सामना कधी?
नीरज चोप्रा आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी भालाफेक करेल. यासाठी त्याला इतर ११ अव्वल स्पर्धकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील क्रमाने आज खेळाडू भालाफेकीसाठी येतील. त्यात नीरज चोप्रा आठव्या स्थानावर आहे.
जेकब वादलेक (झेक)
अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा)
केशॉर्न वॉलकॉट (ट्रिनिनाड अँड टॉबेगो)
अर्शद नदीम (पाकिस्तान)
जुलियन वेबर (जर्मनी)
ज्युलियस येगो (केनिया)
लेस्सी एटलेटालो (फिनलँड)
नीरज चोप्रा (भारत)
अँड्रियन मार्डारे (मालदोवा)
ऑलिव्हर हेलँडर (फिनलँड)
लुईज मॉरिशियो दा सिल्व्हा (ब्राझील)टोनी केरॅनेन (फिनलँड)
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकाराचा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार ८ ऑगस्ट रोजी म्हणजेच गुरुवारी होणार आहे. मध्यरात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी हा सामना सुरू होईल. या सामन्यात वर दिलेल्या क्रमाने सर्व खेळाडू भालाफेकीसाठी येतील.
कुठे पाहता येईल नीरज चोप्राचा सामना?
मध्यरात्री होणारा भालाफेकीचा अंतिम सामना जिओ सिनेमावर Live प्रक्षेपण केला जाणार आहे. त्याशिवाय, स्पोर्ट्स १८ नेटवर्क चॅनलवरदेखील या सामन्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.