Ad imageAd image

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात बेळगावात आंदोलन

ratnakar
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात बेळगावात आंदोलन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. याविरोधात बेळगावात दलित संघर्ष समिती भीमवादतर्फे आज शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा सर्कल येथे आयोजित निदर्शनांमध्ये संतप्त आंदोलकांनी शाह यांच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेचे आयोजन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.

बेळगाव येथील राणी चन्नम्मा सर्कल येथे शनिवारी दलित संघर्ष समिती भीमवादतर्फे मोठे आंदोलन करण्यात आले. अमित शहा यांना हद्दपार करण्यात यावे अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. चन्नम्मा सर्कलपासून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना दलित नेते महादेव तळवार म्हणाले, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत आम्ही आंबेडकर आंबेडकर म्हणणार आहोत. आंबेडकर हे फक्त नाव नाही, तर भारताचा श्वास आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

उपस्थित आंदोलकांनी अमित शाह यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. त्यांनी संसदेत आंबेडकरांचा अपमान करून संपूर्ण दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मोदी स्वतःला दलित समर्थक म्हणवतात, पण हे सरकार दलितविरोधी आहे, असे संतप्त आरोप यावेळी करण्यात आले.

आंदोलनात राज्य संघटक खजिनदार सिद्धप्पा कांबळे, जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. अमित शाह यांच्या वक्तव्यावर दलित संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आंबेडकरांच्या अपमानाला योग्य प्रतिसाद दिला जाईल, असा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून ठोस कृतीची मागणी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article