बेळगाव तालुक्यातील मारिहाळ ग्रामपंचायतिची आता विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
या ग्रामपंचायतीचे मुख्य अभिवृद्धी अधिकारी ( पीडिओ ) श्री हर्षवर्धन M. अगसर यांनी मारिहाळ ग्रामपंचायतीचा कार्यभार संभाळल्यापासून मारिहाळ गावाचा विकास कसा करता यावा याकडे जातीने लक्ष दिले आणि त्यासाठी गावाची पाहणी करून नियोजनबध्द योजना आखली व कामास सुरुवात केली.
मारिहाळ गावात त्यांनी ग्रामपंचायतचे कार्यालय डिजिटल कार्यालय करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच गावातील ग्रंथालय ही डिजिटल पध्दतीने उभारले आहे. याबरोबरच त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय स्वीकारले आहे. त्यामध्ये एक घर एक शौचालय योजना सुरू केली. लोकांना स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रेरित केले – ओला कचरा सुका कचरा वेगळा करून कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाते. गावातील सीसी रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अगदीच मूलभूत गरजांची पूर्तता केली आहे. तसेच गावामध्ये रोजगारासाठी बेरोजगारांना म.गांधी नरेगा योजनेतून काम दिले जाते.
मुख्यतः मारिहाळ गावातील शिक्षण व्यवस्था ही सुधारली आहे. त्यात गावातील ४-५ वर्षातील मुलांसाठी ५-६ अंगणवाडी केंद्राना नाविन्यपूर्ण रूप दिले. गावचे ग्रंथालय ही आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे केंद्र झाले आहे; ६ वर्षांच्या मुलांपासून ते १६ वर्षांच्या मुलांपर्यंत १५०० पेक्षा जास्त सदस्यांची नोंद ग्रंथालयात झाली आहे.
कोविड -१९ संदर्भातही विद्यार्थ्यांना NMMS आणि NTSE स्कॉलरशिप परीक्षांसाठी स्वयंसेवकांनी ग्रंथालयात प्रशिक्षण दिले गेले. या सर्वांच्या मागे ठामपणे पीडिओ अधिकारी हर्षवर्धन म.अगसर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अगसर यांनी माध्यमिक शाळा , उर्दू शाळा साठी ही विशेष महत्त्व देऊन शाळांचा दर्जा वाढवला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, खेळाचे मैदान तयार केले आणि हेच आता मारिहाळ गावातील आकर्षणाचे केंद्र झाले आहे.
एवढेच नाही तर गावातील पावसाचे पाणी अडवून जिरवणे योजना लोकप्रिय झाली आहे. ग्रामपंचायत मध्ये महिलांसाठी बचत गट स्थापन करण्यात आले, महिला सबलीकरणातून NRML या योजनेतून बचत गट रचना करून महिलांसाठी अनेक प्रकारच्या उद्योगांसाठी प्रशिक्षण देण्यात आले . या सर्वांमध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष तौसिक अल्ल्लउद्दिन फनीबंद आणि उपाध्यक्ष तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी एकजुटीने आणि एकमताने काम करायला पीडिओ हर्षवर्धन म.अगसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अगसर यांच्या नेतृत्वाखाली मारिहाळ ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली आहे, त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात अगसर यांच्या बद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. पीडिओ हर्षवर्धन अगसर यांच्यासारखे अभिवृद्धी अधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावे जेणे करून हर एका ग्रामपंचायतीचा विकास होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यासाठी पीडिओ अगसर यांचे हार्दिक अभिनंदन.