महाराष्ट्रात गेल्या १२ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं आहे. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे.
३० ऑगस्टला मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला. त्यानंतर या आंदोलनाचे आणि लाठीमाराचे पडसाद राज्यभरात दिसून आले. राज्यभरात मराठा आंदोलकांनी अनेक ठिकाणी बंद पाळले, मराठा समाज रस्त्यावर उतरला. राज्य सरकारने अनेक वेळा जरांगे यांच्याशी चर्चा केली. मात्र जरांगेंना समाधानकारक निर्णय मिळाला नसल्याने त्यांनी आपलं आंदोलन आजपासून तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे आजपासून पाणी बंद करणार आहेत. त्याचबरोबर सूरू असलेलं सलाईनही काढून टाकणार आहेत. शासनाच्या जीअरमध्ये कोणतीही दुरूस्ती झाली नसल्याने आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलसांना अद्याप बडतर्फ केलं नसल्यानं मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्जुन खोतकर यांना एक बंद लिफाफा दिला. खोतकर यांनी हा बंद लिफाफा जरांगे पाटील यांना दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या जेवढ्या मागण्या होत्या, त्यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.