बंगळुरु : ज्या प्रकल्पाने भारताने इतिहास रचला त्या चांद्रयान-३ ला आपला निरोप देणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ एन वलारमथी यांच दुख:द निधन झालं आहे. २ सप्टेंबरच्या संध्याकाळी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. त्या ६४ वर्षांच्या होत्या. एन वलारमथी या तामिळनाडूतील अरियालूरच्या रहिवासी होत्या. सध्या त्या कुटुंबासह चेन्नईत राहत होत्या. २०१५ मध्ये त्यांना अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वलारमथी यांची एक ओळख म्हणजे त्या देशातील पहिल्या स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह RISAT प्रकल्पाच्या संचालक देखील होत्या. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. पी. व्ही. व्यंकटकृष्ण यांनी त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. माजी शास्त्रज्ञ डॉ. पी व्ही वेंकटकृष्ण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या आगामी मोहिमांमध्ये वालरमथी मॅडमचा आवाज यापुढे ऐकू येणार नाही. मिशन चांद्रयान-३ हे त्यांचे शेवटचे काउंटडाउन होते. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. मिळालेल्या माहितीनुसार, वालारमथी यांनी ३० जुलै रोजी शेवटची घोषणा केली होती.
एन वालारामथी या महिला शास्त्रज्ञ कोण होत्या?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एन वालारामथी या तामिळनाडूच्या रहिवासी होत्या. त्यांचा जन्म ३१ जुलै १९५९ रोजी अरियालूर येथे झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १९८४ मध्ये इस्रोमध्ये प्रवेश केला. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एन वलरामथी यांनी विविध अंतराळ मोहिमांमध्ये योगदान दिले. त्यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित रडार इमेजिंग उपग्रह RISAT-1 साठी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केले. एप्रिल २०१२ मध्ये RISAT-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हर नव्या गुपितांच्या शोधात
एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित झालेल्या महिला शास्त्रज्ञ एन वलरामथी या पहिल्या वैज्ञानिक होत्या. अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला होता. अब्दुल कलाम पुरस्कार २०१५ मध्ये सुरू झाला होता.