Ad imageAd image

उंच श्रीमूर्तींच्या बाबतीत मंडळांनी विचार करावा -जाधव

ratnakar
उंच श्रीमूर्तींच्या बाबतीत मंडळांनी विचार करावा -जाधव
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगाव शहरातील मोठमोठ्या आकाराच्या तब्बल 350 हून अधिक सार्वजनिक श्री गणेश मूर्ती लक्षात घेता त्यांच्यासाठी विसर्जन कुंड क्षमतेने कमी पडत आहेत.
त्यामुळे जोपर्यंत श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मोठे तलाव उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत मोठ्या उंच मूर्ती करुन घेण्यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गांभीर्याने विचार करावा, अशी जाहीर विनंती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूरचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केली आहे.
बेळगाव शहर व उपनगरातील अनेक श्री गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशाच्या सुरेख अशा 15, 20, 25 फुटी भव्य मुर्ती मूर्तिकारांकडून बनवून घेतल्या आहेत. सर्वच ठिकाणच्या श्रीमुर्ती सुरेख असल्यामुळे निश्चितच भाविकांची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु एक लक्षात घेतले पाहिजे की, पुण्याप्रमाणे बेळगाव भागात सतत वाहणाऱ्या नद्या नाहीत. तसेच मुंबई प्रमाणे याठिकाणी समुद्रही नाही.

आपल्या शहरात श्री गणपती विसर्जन करण्यासाठी निर्माण केलेले कुंड हे आकाराने व खोलीने लहान आहेत. त्यामुळे या कुंडांमध्ये 350 हून अधिक इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या सार्वजनिक श्री गणेश मुर्तीं विसर्जन करता येतील की नाही? अशी शंका येते, या संदर्भात मी पोलीस प्रशासनाच्या बैठकीत सुद्धा ही भीती व्यक्त केली असून श्री गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी पर्यायी जागा शोधावी अशी विनंतीही केली आहे.

गेल्या 5 -6 वर्षांपूर्वी मोठ्या उंचीची श्री गणेश मूर्ती घेऊन जात असताना सदाशिवनगर या भागात विजेच्या तारेचा धक्का बसून 3-4 जणांना प्राणास मुकावे लागले होते. सदर घटना तसेच सध्या उपलब्ध असलेले तुलनेत कमी क्षमतेचे विसर्जन कुंड लक्षात घेता जोपर्यंत बेळगावमध्ये श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी मोठे तलाव उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत अशा उंच मुर्ती करुन घेण्यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी जाहीर नम्र विनंती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूरचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article