बेळगाव : बेकायदेशीर मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून बेळगाव जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी आज भल्या पहाटे तिघा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकून कागदपत्रांची तपासणी व चौकशी सुरू केली आहे. या धाडींमुळे एकच खळबळ उडाली आहे.
लोकायुक्त अधिकाऱ्यांची पहिली धाड अलीकडेच बेंगलोर येथे बदली झालेले व्यावसायिक कर खात्याचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश मुजुमदार यांच्या सह्याद्रीनगर, बेळगाव येथील घरावर पडली आहे.
दुसरी धाड ग्राम लेखापाल अर्थात तलाठी असलेल्या विठ्ठल शिवाप्पा ढवळेश्वर यांच्या निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील घरावर पडली आहे. त्यांच्या रामदुर्ग तालुक्यातील कामानकोप्प गावात असलेल्या घराचीही झडती घेतली जात आहे. यापूर्वी एकदा बागलकोटकडे कारमधून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असताना रामदुर्ग तपास नाक्याच्या ठिकाणी ढवळेश्वर यांना पकडण्यात आले होते.
या दोन धाडी व्यतिरिक्त धारवाड येथील कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंदाप्पा हनुमंतप्पा भजंत्री यांच्या उगरगोळ (ता. सौंदत्ती जि. बेळगाव) येथील घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.
बेकायदेशीर मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून या धाडी टाकण्यात आल्या असून तीनही ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी आणि सखोल चौकशी केली जात आहे.