दिल्ली : आज देशातील दूरसंचार उद्योगाकडून 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील 1 ऑक्टोबर 2022 तारखेची इतिहासात नोंद हाेईल, असे प्रतिपादन आज (दि.1) पंतप्रधान नरेंद्र यांनी केले. दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5-G सेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बाेलत हाेते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, ‘ही नव्या संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो. भारताच्या 21 व्या शतकातील विकसनशील क्षमता पाहण्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातील 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख इतिहासात नोंदवली जाणार आहे.’
नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रीय भूमिका बजावेल. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाची रचना करताना, त्या संबंधित उत्पादनात भारताची मोठी भूमिका असेल. 2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता; पण 5G ने भारतासाठी एक नवा इतिहास रचला आहे. 5G सह, भारत प्रथमच दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये जागतिक मानक स्थापित करत आहे’, असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.
5-G सेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आदी मेट्रो शहरांचा समावेश आहे. त्यानंतर दोन वर्षांत 5-G कनेक्टिव्हिटी देशभरात वेगाने विस्तारली जाईल. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, मुंबई, पुणे, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनौ या 13 शहरांमध्ये 5-Gसेवा सुरू केली जाणार आहे.