बेळगाव : मुडा घोटाळ्यानंतर मुख्यमंत्र्यांबाबत झालेल्या अनेक घडामोडींनंतर आता मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी गटातील आमदारांच्या, नेत्यांच्या अंतर्गत बैठकांना जोर आला असून मंत्री सतीश जारकीहोळी, महादेवाप्पा आणि गृहमंत्री यांनी नुकतीच एक बैठक घेतली. मात्र या बैठकीनंतर देखील राजकीय चर्चा जोर धरू लागल्या असून याबाबत गृहमंत्री जी परमेश्वर यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी, महादेवाप्पा आणि माझी बैठक झाली परंतु या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा केलेली नाही, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले.
सिद्धरामय्याच पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहतील, असे मी अनेकदा सांगितले आहे. मी काल म्हैसूरमध्येही असेच म्हणालो. मुख्यमंत्री बदलाबाबत आपली कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा भविष्यातही आपण याविषयावर चर्चा करणार नाही असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, आपल्याला विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभारण्यात येत आहे. आम्ही जबाबदार पदावर कार्यरत आहोत. ज्येष्ठ राजकारणी आहोत. माझ्यावर जबाबदारी आहे.
मी सिद्धगंगा मठात गेलो यावरूनही राजकारण करण्यात आले. मात्र आपण तेथे केवळ दर्शन घेण्यासाठी गेलो, यावरूनही राजकारण करणे गरजेचे नाही, असे सांगत त्यांनी माजी मंत्री आर. अशोक यांना टोला लगावला.