बेळगाव : बेळगाव सभोवतालच्या शहराच्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि नैऋत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नैऋत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
बेळगाव-हुनगुंद-रायचूर रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आणि नैऋत्य रेल्वे विभागाशी संबंधित असलेल्या बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादन करा.तसेच बेळगाव शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामांना चालना द्या, असे खासदार शेट्टर म्हणाले. तिसरा रेल्वे गेट येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि ते काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना खासदारांनी केली.
बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महामार्ग योजना संचालक भुवनेश्वर कुमार, भूसंपादन अधिकारी चव्हाण, नैऋत्य रेल्वे विभागाचे अधिकारी विनयकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सबरद, रेल्वे भूसंपादन अधिकारी आदी उपस्थित होते.