बेळगाव शहरातील शहापूर आणि वडगाव भागात संगीताच्या तालावर थिरकत आणि एकमेकावर रंग उडवत उत्साही वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे रंग खेळण्याची संधी मिळाली नसल्याने मंगळवारी सगळ्याच वयोगटातील व्यक्तींनी रंगपंचमीचा आनंद लुटला.बेळगाव शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जातो तर शहापूर आणि वडगाव भागात पंचमी दिवशी रंग खेळला जातो.शहापूर आणि वडगाव हा भाग स्वातंत्र्यापूर्वी सांगली संस्थानचा भाग होता.तेव्हापासून पंचमी दिवशी रंगपंचमी खेळण्याची परंपरा आजही पाळली जाते.
अनेक ठिकाणी पाण्याच्या शॉवर ची व्यवस्था करण्यात आली होती.बहतेक गल्ल्यांमध्ये डॉल्बी लावून तरुणाई बेभान होवून नृत्य करत होती.तरुणी आणि महिला देखील उत्साहाने रंग खेळण्यात आणि नृत्यात सहभागी झाल्या होत्या.इस्कॉन भक्तांनी भजन गावून वाद्यवृंदासह रंगपंचमी मध्ये सहभाग दर्शवला.