Ad imageAd image

चंद्रपुर पोस्टल मतदानात काँग्रेस आघाडीवर मात्र, ईव्हीएमवर भाजप… काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे म्हणतात, “बाऊंसर लावून पैसे वाटप केले”

ratnakar
चंद्रपुर पोस्टल मतदानात काँग्रेस आघाडीवर मात्र, ईव्हीएमवर भाजप… काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे म्हणतात, “बाऊंसर लावून पैसे वाटप केले”
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात पोस्टल मतदानात काँग्रेस उमेदवार मतमोजणीत आघाडीवर होते. मात्र, ईव्हीएमवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. ईव्हीएम मध्ये शंभर टक्के घोळ आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सहाही मतदार संघात भाजप उमेदवारांनी बाऊंसर लावून पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठरावही काँग्रेसच्या समीक्षा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती धोटे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदार संघात काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेसची समीक्षा बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धोटे बोलत होते. काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाला ईव्हीएम हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. हा ठराव काँग्रेसच्या राज्य समितीलाही पाठविण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावरील टक्केवारी बघितली असता त्यात घोळ असल्याचे दिसून आले. यावर राज्यभरातील चोवीस उमेदवारांनीही शंका व्यक्त केली आहे. पोस्टल मतदानात काँग्रेसचे उमेदवार समोर होते. मात्र, ईव्हीएमवर मागे कसे हा प्रश्न आहे. राजुरा विधानसभेत 61 लाख रुपये पकडले. त्याची तक्रार करण्यात आली असून मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या इशाऱ्यावरून प्रशासनाने काम केल्याचा आरोपही धोटे यांनी केला. सहाही विधानसभेत बाऊंसर लावून पैसे वाटप करण्यात आले. विधानसभा बाहेरील व्यक्तींना मतदानाच्या काळात परवानगी नसते. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अनेक ठिकाणी पैसे पकडण्यात आले. मात्र, पैसे वाटप करणाऱ्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. आचारसंहितेच्या काळात पालकमंत्र्यांनी मंदिर, समाज भवनासाठी निधी दिल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी केला.

नागभीड येथील शिवनगरातही पैसे वाटप करण्यात आले. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. वरोरा-भद्रावती मतदारसंघात आम्ही अनेक विकासकामे केली. असे असतानाही अनेक बूथवर काँग्रेसच्या उमेदवाराला कमी मतदान कसे काय पडले, असा प्रश्न खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला. ज्या बूथवर बसायला माणसे भेटली नाही, त्या बूथवर भाजपच्या उमेदवारांना जास्त मते मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला चिमूरचे उमेदवार डॉ. सतीश वारजूकर, वरोराचे उमेदवार प्रवीण काकडे, चंद्रपूरचे उमेदवार प्रवीण पडवेकर आणि बल्लारपूरचे उमेदवार संतोष रावत यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसची शनिवारी हॅाटेल सिद्धार्थ येथे समीक्षा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी कुणीही कुणावर आरोप प्रत्यारोप करू नये अशी सूचना केली. तरीही चिमूर तालुका काँग्रेसच्या वतीने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी का जाहीर करीत नाही, बूथ समिती नाही तसेच इतरही काही बाबींबद्दल नाराजी व्यक्त केली. यात पैसा आणि ईव्हीएम मशीनवर खापर फोडण्यात आले. ईव्हीएमविरोधात काँग्रेस स्वाक्षरी मोहीमही राबविणार आहे. येत्या काळात संघटन आणखी कसे मजबूत करण्यात येईल यावरही चर्चा करण्यात आली. बैठकीला खा. प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, संतोष रावत, डॉ. सतीश वारजूकर, प्रवीण काकडे, प्रवीण पडवेकर, विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकतारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article