बेळगाव : श्री गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे बेळगाव महापालिकेतर्फे शहरातील श्री गणेश मूर्ती विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यात येत असून रंगरंगोटीचे काम देखील वेगाने हाती घेण्यात आले आहे. श्री गणेशोत्सवाला येत्या शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी प्रारंभ होणारा असून त्यानंतर मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी भक्तीभावाने बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
श्री गणेशोत्सव काळात शहरातील कपिलेश्वर तलाव, जुने बेळगाव व अनगोळ येथील तलाव, जक्कीनहोंडा तलाव, किल्ला तलाव आदी ठिकाणी दीड दिवस 7 दिवस आणि 11 दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन अधिक प्रमाणात होते.
त्याचप्रमाणे यापैकी प्रामुख्याने कपिलेश्वर तलाव आणि जक्कीनहोंड तलावामध्ये शहरातील बहुतांश सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर सदर तलावांची स्वच्छता करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.
या तलावांची रंगरंगोटीही केली जात असून किल्ला त्याला परिसरातील विसर्जन विहिरीची रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कपिलेश्वर तलावाचे रंगकाम वेगाने सुरू आहे. एकंदर सदर तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्याबरोबरच तलावातील दूषित पाणी बाहेर काढून त्यामध्ये नवीन पाणी भरण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम पूर्ण झाल्यानंतर तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी ज्यादा कर्मचारी देण्यात आले असून तलाव परिसरातील बंद असलेले पथदीप व हायमास्ट दुरुस्त केले जात आहेत. या पद्धतीने श्री गणेशोत्सवासाठी शहरातील सर्व विसर्जन तलाव सज्ज केले जात आहेत.