Sharad Pawar appeal: बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यावर आता देशात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी त्याचे पडसाद पाहायला मिळाले. यानंतर राज्यात काल तणावपूर्ण परिस्थिती दिसली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून बांगलादेशमध्ये घडणाऱ्या गोष्टींचा राज्यावर परिणाम होऊ देऊ नका, असे सांगितले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“बांगलादेशमध्ये सत्तांतर झाले. यासाठी तरुण पिढीने उठाव केला होता. त्यातून काही गोष्टी घडल्या. पण दुर्दैवाने त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटली. प्रामुख्याने बांगलादेशच्या सीमेवरील पश्चिम बंगाल आणि इतर राज्यात परिस्थिती अधिक गंभीर होती. पण तिथे काही घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असे कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील व्यक्तींनी सयंमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहिल, याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढेच मी सांगू इच्छितो”, असे पवार म्हणाले.