बेळगाव : वीज बिल आल्यानंतर ते 30 दिवसांच्या आत न भरल्यास ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा इशारा वजा आदेश हुबळी वीज पुरवठा कंपनीने अर्थात हेस्कॉमने जारी केला आहे. हा नवा आदेश येत्या 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे.
या नव्या आदेशानुसार निवासी, व्यावसायिक, अपार्टमेंट आणि तात्पुरती वीज जोडणी (कनेक्शन) असलेल्या ग्राहकांना विहित 30 दिवसांच्या आत आपले वीज बिल भरावे लागेल.
अन्यथा पुढील दर महिन्याचे पहिले 15 दिवस वीज जोडणी खंडित केली जाईल. आतापर्यंत वीज जोडणी तोडण्यासाठी लाइनमनसोबत मीटर रीडर्स जात होते. मात्र यापुढे लाइनमन मीटर रिडर्ससोबत जाऊन बिल थकीत असल्यास वीज कनेक्शन तोडणार आहेत.
जर 15 दिवसांत बिल न भरल्यास पुढील मीटर रिडिंगच्या दिवशी वीज जोडणी खंडित केली जाईल. अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बाबतीत रक्कम 100 रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा ग्राहकांचे वीज कनेक्शनही खंडित केले जाईल, असे हेस्कॉमने जारी केलेल्या निवेदनात नमूद आहे.