बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजना बुधवारी १३ हजार ठिकाणी एकाच वेळी सुरू होणार आहे. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात दक्षिण कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील १.१ लाखांहून अधिक महिला लाभार्थी सहभागी होतील.
म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे राज्यभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
म्हैसूर येथील महाराजा कॉलेज ग्राऊंडवर कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना आणण्यासाठी केएसआरटीसी एक हजार ८०० बसेस उपलब्ध करून देत आहे. हेब्बाळकर म्हणाल्या की, म्हैसूर, हासन, चामराजनगर, कोडगू आणि मंड्या जिल्ह्यातील लाभार्थी म्हैसूरमधील उद्घाटन कार्यक्रमात सामील होतील.
या योजनेंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये मिळणार आहेत. काँग्रेसच्या आघाडी सरकारची ही चौथी हमी योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाच जिल्ह्यांतील महिला लाभार्थ्यांना म्हैसूरमध्ये आणण्याची जबाबदारी दिली आहे.
सर्व ग्रामपंचायती आणि शहर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ही योजना सुरू केली जाईल, जेणेकरून ते काँग्रेस सरकारच्या योजनांचा लाभ घेतील, असे काँग्रेसच्या एका नेत्यने सांगितले.