Ad imageAd image

बेळगावात ट्रॅक्टर खाली सापडून गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू

ratnakar
By ratnakar
बेळगावात ट्रॅक्टर खाली सापडून गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव :बेळगाव शहरातील लांबलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकी प्रसंगी ट्रॅक्टरखाली सापडून एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कपिलेश्वर उड्डाणपूलावर आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. मयत दुर्दैवी गणेश भक्ताचे नांव सदानंद बी. चव्हाण -पाटील (वय 48 रा. पाटील गल्ली, येळ्ळूर -सुळगा बेळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकी प्रसंगी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती ट्रक, ट्रॅक्टर वगैरे वाहनावरून कपिलेश्वर उड्डाण पुलावरून कपिलेश्वर तलावाकडे विसर्जनासाठी नेण्यात येत आहेत.

या पद्धतीने मिरवणूक सुरू असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उड्डाण पुलाच्या उतारावर ट्रॉलीमधून बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर अचानक नियंत्रण सुटल्याने वेगाने पुढे गेला. अचानक घडलेल्या या घटनेत बेसावध असलेल्या सदानंद याला ट्रॅक्टरची धडक बसली आणि तो थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला.

या अपघातात ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या सदानंद याला चिंताजनक अवस्थेत तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तथापि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेत अन्य एक कार्यकर्ता जखमी झाला असून विजय राजागोळ वय 56 वर्षे  रा. तेगीन गल्ली वडगाव असे त्याचे नाव आहे.
सदानंद चव्हाण -पाटील ट्रॅक्टर खाली सापडताच उड्डाण पुलावर धावपळ व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच विसर्जन मिरवणूक कांही काळ ठप्प झाली होती. सदर घटना घडताच बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, माजी महापौर विजय मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. सदर अपघाताची पोलिसात नोंद झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article