बेळगाव : बेळगावात गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडलेली असतानाच ऐन सुगीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
बेळगाव तालुक्यात सुगीच्या कामांना वेग आला आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात वातावरणात कमालीचा बदल झाला असून थंडी गायब होऊन अचानक ढगाळ वातावरण, तर गेल्या दोन दिवसांपासून कडक उन्हाचे चटके लागत होते.
शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी 5.30 च्या सुमारास शहर – परिसरात पावसाच्या जोरदार सारी कोसळल्या असून शेतकऱ्यांना मात्र या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
तालुक्याच्या भागात मळणी, कापणी यासह कडधान्य पेरणी सुरु आहे. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत, तर कित्येक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे.
दक्षिण भारतात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे प्रसारमाध्यमांवर झळकत असून हवामान खात्यानेही पावसाची शक्यता वर्तविली होती.