Diwali 2024: 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे दिवाळी? लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे?
दिवाळी सण आनंदाचा आणि उत्साहाचा, घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून आपण अंधाराला दूर करत असतो. दिवाळी कधी येणार लहान मुल नेहमी हा प्रश्न विचारतात आणि आपण सुद्धा दिवाळीची आतुरतेने वाट पाहतो. यंदा दिवाळी साजरी करताना एक प्रश्न सगळ्यांना पडलाय, तो म्हणजे दिवाळी कधी साजरी करायची, ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेबरला?
शास्त्रानुसार असे म्हटले जाते, अश्वीन अमावस्या प्रदोष काळापासून मध्यरात्रीपर्यंत जेव्हा असते तेव्हा दिवाळी साजरी केली जाते. ज्योतिषांच्यामते प्रदोष काळातच लक्ष्मीचे आगमन होते. तर निशिथ काळात इतर पूजा खास करून तांत्रिक पूजा केल्या जातात. यंदा अमावस्या तिथी दोन दिवसांत विभागलेली आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी अमावस्येचा प्रारंभ होत असून, 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी अमावस्या समाप्त होते आहे. त्यामुळे जे लोक उदय तिथि, म्हणजेच सूर्य उगवल्यानंतरच्या तिथीला महत्त्व देतात, ते 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळी साजरी करण्याला अधिक प्राधान्य देतील. तर जी मंडळी प्रदोष काळापासून मध्यरात्रीपर्यंत असणाऱ्या अमावस्येला महत्त्व देऊन 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी साजरी करतील .
दिवाळी कधी आहे, या प्रश्नासह लक्ष्मी पूजन कोणत्या दिवशी करायचे यावरूनही लोकांच्या मनात संभ्रम आहे. अमावस्या तिथी दोन दिवस असल्यामुळे ही समस्या येत आहे, शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा प्रभाव प्रदोष काळात जास्त असतो. तसेच स्थिर लग्नात माता लक्ष्मीची पूजा केल्याने महालक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहते असे म्हणतात. म्हणून दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात आणि वृषभ लग्नात महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा करणे सर्वोत्तम मानतात.
पंचांगानुसार 31 ऑक्टोबर रोजी वृषभ लग्न संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत प्रदोष काळ आहे. प्रदोषकाळ, वृषभ लग्न आणि चौघड्या लक्षात घेतल्यास, तुम्ही जर 31 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन करण्याचा विचार करत असाल तर संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांपासून 7 वाजून 13 मिनिटांचा कालावधी सर्वोत्तम राहील. एकूण 48 मिनिटे लक्ष्मी पूजनासाठी मिळत असून हा मुहूर्त लक्ष्मी पूजनासाठी सर्वश्रेष्ठ असेल. तर 31 ऑक्टोबरला रात्री 11 वाजून 39 मिनिटांपासून ते साडे बारावाजेपर्यंत निशीथ काळ असेल, जो तंत्र-मंत्र साधनेसाठ उपयुक्त मानला जातो.
1 नोव्हेंबर लक्ष्मी पूजनाचा मुहुर्त
1) समजा ,31 ऑक्टोबर रोजी तुम्ही लक्ष्मी पूजन करू शकला नाहीत, तर काळजी करू नका.
2) दिवशी अर्थात 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ०४ मिनिटांपासून ते ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंतचा कालावधी चांगला आहे.
3) दिवाळी आणि लक्ष्मी पूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर रोजी नक्की कधी साजरे करावे हे ठरवत असताना, तुमच्या घरातील परंपरा, रितीरिवाज यांनाही महत्त्व द्या. शास्त्र आणि तुमच्या घरातील परंपरा याची सांगड घालून दिवाळी आणि लक्ष्मी पूजन करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !