Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास आठ दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र, अखेर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालं आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची गटनेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह काही राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना “एक है तो सेफ है “असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“सर्वप्रथम मी सर्व आमदारांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरु झाली. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला दिलं. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यांचेही मी आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवलं. अर्थात एकदा 72 तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीच्या सरकारचा शपथविधी कधी?
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि दिग्गज नेते तसेच विविध राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.