नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई, नीट आणि सीयूईटी अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे.
एनटीएने एका एक्स पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 हे 24 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. तर जेईई मेन सेशन 2 हे 1 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या दरम्यान पार पडेल. या दोन्ही परीक्षा सीबीटी (कम्प्युटर बेस्ड टेस्ट) या पद्धतीने होणार आहेत.
NEET
नॅशनल एलिजिब्लिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (NEET-UG), जी पेन टू पेपर/ओएमआर फॉर्मॅटमध्ये घेतली जाते, ती 5 मे 2024 रोजी पार पडेल. या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल, असंही सांगण्यात आलं आहे.
CUET
कॉमन युनिवर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (CUET) याची यूजी आणि पीजी परीक्षा ही वेगवेगळी घेण्यात येणार आहे. CUET-UG ही परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 दरम्यान पार पडेल. तर, CUET-PG ही परीक्षा 11 ते 28 मार्च दरम्यान पार पडेल. या परीक्षा देखील CBT पद्धतीने घेतल्या जातील.
NET
यूजीसी-नेट (UGC NET) परीक्षा ही 10 जून ते 21 जून 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे. असिस्टंट प्रोफेसरशिप आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा घेतली जाते.
निकाल कधी?
यूजीसी चेअरमन एम. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार; CUET PG, UG आणि NET परीक्षांचे निकाल हे शेवटचा पेपर झाल्यानंतर तीन आठवड्यांमध्ये लागणार आहेत.