Ad imageAd image

दलित संघर्ष समितीचा उद्या रेल्वे स्थानकासमोर आमरण धरणे सत्याग्रह 

ratnakar
दलित संघर्ष समितीचा उद्या रेल्वे स्थानकासमोर आमरण धरणे सत्याग्रह 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : वर्ष उलटून गेले तरी आश्वासन दिल्याप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानक नूतन इमारतीच्या दर्शनीय भिंतीवर छ. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पं बसवली नसून त्याच्या निषेधार्थ आणि ती शिल्प तात्काळ बसवावीत, या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे (भीमवाद) उद्या बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी बेळगाव रेल्वे स्थानकासमोर आमरण धरणे सत्याग्रह सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती कर्नाटक दलित संघर्ष समितीचे जिल्हा संघटना संचालक संतोष कांबळे यांनी दिली.

शहरातील हॉटेल मिलनमध्ये आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. संचालक संतोष कांबळे यांनी सांगितले की, जुन्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर या स्थानकाच्या नव्या इमारतीच्या दर्शनीय भिंतीवर विविध महापुरुष, विरांची शिल्पे बसवण्यात आली. मात्र त्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज आणि देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान देण्यात आले नाही. यासंदर्भात गेल्या 2023 मध्ये आम्ही रेल्वे स्थानकावर जाऊन चौकशी करून शहानिशा केली असता रेल्वे अधिकाऱ्यांनी छ. शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांची शिल्पं एका अडगळीच्या खोलीत ठेवण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.

या पद्धतीने या दोन्ही महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आम्ही त्यावेळी रेल्वे स्थानकासमोर दिवसभर आंदोलन देखील छेडले होते. त्यावेळी म्हणजे 27 फेब्रुवारी 2023 रोजी रेल्वे प्रशासनाने येत्या दोन-तीन महिन्यात निर्णय घेऊन महाराजांसह बाबासाहेबांचे शिल्प रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भागी बसवले जाईल, असे आश्वासन दिले होते.

तरी सदर आश्वासनाच्या अनुषंगाने आजतागायत वर्ष उलटून गेले तरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आमच्या मागणीची तात्काळ पूर्तता व्हावी यासाठी उद्या बुधवारी 14 ऑगस्ट रोजी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे (भीमवाद) बेळगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडून आमरण धरणे सत्याग्रह केला जाणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भिंतीवरील शिल्पांमध्ये जोपर्यंत छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला स्थान दिले जात नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

या आंदोलनात संघटनेचे जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे जिल्हा संघटना संचालक संतोष कांबळे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस कर्नाटक दलित संघर्ष समितीचे (भीमवाद) जिल्हा संचालक सिद्राय मेत्री, शंकर कांबळे आदींसह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article