बेळगाव : उत्तर कर्नाटक- महाराष्ट्र प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटीसंदर्भात महत्त्वाचा टप्पा म्हणून, मिरज- बेंगलोर विभागाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याबद्दल कुडची आणि मिरज दरम्यान इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह रेल्वेसह सीआरएस तपासणी आज यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. मिरज ते बेंगलोर असा संपूर्ण विद्युतीकरण केलेला दुहेरी मार्ग उपलब्ध करून देणे म्हणजे दक्षिण भारतातील रेल्वे प्रवास वाढवण्याच्या दिशेने यशाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) आज नव्याने विद्युतीकरण केलेल्या विभागाची पाहणी केली आणि पूर्ण क्षमतेने इलेक्ट्रिक रेल्वे चालवण्यास अंतिम मंजुरी दिली. या प्रमुख विभागाचे विद्युतीकरण आता पूर्ण झाल्यामुळे मिरज ते बेंगलोर रेल्वे मार्ग काही दिवसांतच संपूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. या महत्त्वपूर्ण विकासाबरोबरच मिरज ते पुणे दरम्यानच्या विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. यामुळे या प्रदेशातील रेल्वेचे जाळे अधिक बळकट होण्याबरोबरच अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक रेल्वे सेवेची शक्यता निर्माण होते.
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह रेल्वेसह सीआरएस तपासणी आज कुडची आणि मिरज दरम्यान यशस्वीरित्या करण्यात आली. मिरज -बेंगलोर विभागाच्या यशस्वी विद्युतीकरणासह रेल्वे अधिकारी आता या मार्गावर सेवा देण्यासाठी नवीन उच्च गती रेल्वे (हाय-स्पीड ट्रेन) सुरू करण्याकडे लक्ष देत आहेत.
अपेक्षित जोडण्यांमध्ये पुणे -बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश असून जी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. वेगवान आणि आधुनिक सुविधांसाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुणे ते बेळगाव दरम्यानचा प्रवासवेळ लक्षणीयरीत्या कमी करेल. तसेच प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
येत्या कांही दिवसांत रेल्वे मार्ग कार्यान्वित करणे आणि पुणे-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत पुढील घोषणा अपेक्षित आहेत. आता रेल्वे जिज्ञासू, वारंवार प्रवास करणारी मंडळी, उद्योजक व व्यावसायिक या सेवांच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्या देशातील रेल्वे वाहतुकीत नवीन मानक (बेंचमार्क) प्रस्थापित करण्याचे वचन देतात.