Ad imageAd image

मालवणमधील शिवमूर्ती प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी

ratnakar
मालवणमधील शिवमूर्ती प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मालवणमध्ये अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेली राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याची दुर्घटना काल घडल्याने शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत.
आज बेळगावमध्ये काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्यावर टीका करत झालेल्या घटनेप्रकरणी संपूर्ण देशवासीयांची आणि शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना मृणाल हेब्बाळकर म्हणाले, भाजपकडून नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जनतेच्या भावनेचा खेळ केला जातो. महापुरुषांच्या नावाखाली राजकारण केले जाते. मालवणमध्ये घडलेली दुर्घटना हि भाजपासाठी लाजिरवाणी बाब असून या घटनेबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
ते केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण करतात. बेळगावमध्ये येळ्ळूर येथे आमदार आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून राजहंसगडावर भव्य शिवमूर्ती स्थापन केली. उंचीवर, वाऱ्यात आणि पावसात देखील बेळगावमधील शिवमूर्ती सुस्थितीत आहे. परंतु इतका निधी खर्च करून उभारण्यात आलेली मालवणमधील मूर्ती केवळ ८ महिन्यातच कोसळली हे दुर्दैव आहे.राजकारण्यांनी महापुरुषांच्या नावावर होत असलेले राजकारण थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.

मालवणमधील मूर्ती उभारण्यापूर्वी त्याचा पूर्णपणे अभ्यास करणे गरजेचे होते. मूर्ती उभारण्यापूर्वी सर्वंकष अभ्यास करून एकंदर कामाचा दर्जा तपासणे गरजेचे होते. मात्र हि मूर्ती उभारणारे ठेकेदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील असून हि मूर्ती उभारण्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मृणाल हेब्बाळकर यांनी केला. याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मूर्तीचे अनावरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवराज कदम यांच्यासह काँग्रेसचे विविध नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article