Ad imageAd image

जिल्हाधिकाऱ्यांचे खानापूर तालुक्यातील पूर परिस्थितीवर तोडगा काढण्याचे आश्वासन

ratnakar
जिल्हाधिकाऱ्यांचे खानापूर तालुक्यातील पूर परिस्थितीवर तोडगा काढण्याचे आश्वासन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असून शहराची गणना स्मार्ट सिटी मध्ये करण्यात आली आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून शहरात अर्धवट परिस्थितीत असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांची उडणारी दैना तर दुसरीकडे ग्रामीण भागात मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांची उडणारी तारांबळ याचे ताजे उदाहरण म्हणजे खानापूर तालुक्यात पहायला मिळते.

गर्द वनराईच्या मध्यभागी वसलेल्या तालुक्यात अनेक अशी गावे आहेत जी आजही मूलभूत आणि पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. या तालुक्यातील वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळा आला कि नरकयातना सोसाव्या लागतात. मात्र खानापूर तालुक्यातील या समस्यांवर तोडगा काढत खानापूरमधील नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यात येऊन या भागाचा विकास करण्याचा निर्धार प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने, मंत्री महोदयांच्या सहकार्याने आपण केला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केली.

खानापूरमध्ये अद्यापही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या भागातील नद्यांना पूर येतो. येथील जनजीवन विस्कळीत होते. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पालकमंत्री, जलसंसाधन विभाग, महसूल विभाग, लोकप्रतिनिधींसह विविध अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा केला. हा भाग सर्वाधिक वनराईने व्यापला असून अनेक समस्या आहेत.

आमगाव आणि कृष्णापूर समस्येवर  सध्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार या भागातील नुकसानग्रस्तांना शक्य तितक्या सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असून अडचणीत अडकलेल्या लोकांना कशापद्धतीने बाहेर काढायचे यासाठी जिल्हा प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कार्यरत आहे. येथील जनतेला सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी वनविभाग मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री यांची बैठक होणार असून या बैठकीत या भागातील समस्या सोडविण्याच्या चर्चेवर भर देण्यात येणार आहे. या भागातील परिस्थिती सुधारेल असा आपल्याला विश्वास असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

या भागातून गोव्याला अनेक वाहने जातात. मात्र अतिवृष्टीमुळे येथील पूर पाण्याखाली गेल्याने चोर्ला आणि अनमोड वगळता पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्णपणे वाहतूक बांध करण्यात आली असून अवजड वाहनांना वेळापत्रकानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कारवारच्या शिरूरमध्ये भूस्खलन झाल्याने रामनगरमधून गोव्याला जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र कारवारच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून सोमवारपासून वाहतूक सुरु करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article