शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला.त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या शपथविधीला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते. तसेच, भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते.
बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबई मध्ये दाखल झाले. मुंबईत आल्यावर त्यांनी सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र राजभवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच या नव्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. तसे ट्विटही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. त्यानुसार फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावरून भाजपातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.
आता या नव्याने स्थापन झालेल्या भाजपा आणि शिवसेना युती सरकारला विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तरी ही बहुमत सिद्ध चाचणी येत्या शनिवारी होणार आहे.