बेळगाव : कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारच्या हमी योजनांचा करिष्मा चन्नपट्टण, संडूर, शिग्गावी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत दिसून आला असून तिन्ही मतदार संघात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला आहे. काँग्रेसच्या विजयामुळे एनडीएला मोठा धक्का बसला आहे.
चन्नपट्टण पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सि. पी. योगेश्वर यांनी भाजपाचे उमेदवार निखिल कुमारस्वामी यांचा दारुण पराभव केला. तर शिग्गावी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यासीर खान पठाण यांनी भाजपाचे उमेदवार भरत बोम्मई यांना पराभूत केले.
याचप्रमाणे संडूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या अन्नपूर्णा तुकाराम यांनी एनडीएच्या उमेदवार बंगारू हनमंथा यांचा पराभव केला. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार निखिल कुमारस्वामी, भरत बोम्मई आणि बंगारू हनमंत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चन्नपट्टण पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेरीत निखिल कुमारस्वामी पुढे होते, परंतु नंतर सि. पी. योगेश्वर यांनी 25413 मतांच्या फरकाने विजय मिळवला. अखेरच्या फेरीत सि. पी. योगेश्वर यांनी 113,642 मतं मिळवली, तर निखिल कुमारस्वामी 82,229 मतांसह पराभूत झाले. शिग्गावी मतदारसंघात सुरुवातीला भरत बोम्मई 800 मतांच्या फरकाने पुढे होते, परंतु नंतर यासीर खान पठाण यांनी 13,428 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसला 83,4०० मतं मिळाली, तर भाजपाला 69,972 मतं मिळाली. संडूर पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेरींमध्ये अन्नपूर्णा तुकाराम आघाडीवर आघाडीवर होते . अखेरच्या फेरीत काँग्रेसने 9,649मतांच्या फरकाने विजय मिळवला. अन्नपूर्णा तुकाराम यांनी 93,616 मतं मिळवली, तर भाजपाला 83,967 मतं मिळाली.
या तीनही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने प्रभावी विजय मिळवला असून एनडीएला मोठा धक्का बसला आहे. पोटनिवडणुकीत समोर आलेल्या निकालानंतर कर्नाटकात हमी योजनांचा करिश्मा चांगलाच लोकप्रिय ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.