दिल्ली- केंद्र सरकार इंडिया नावाचा त्याग करुन सगळीकडे भारत नाव धारण करत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबरला इंडोनेशिया दौऱ्यावर जात आहेत. यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रांवर प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय. तसेच जी-२० शिखर परिषदेसाठी देण्यात येत असलेल्या ओळख पत्रांवर देखील प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे.
इंडिया नाव बदलून भारत करण्याचा केंद्र सरकारचा इरादा स्पष्ट आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर टीका केली आहे. पण, केंद्र सरकारने हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही असं दिसून येतंय. कारण, पंतप्रधान मोदी हे मागील महिन्यात ग्रीस आणि साऊथ अफ्रिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी जारी करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांवरही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असा उल्लेख करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी सात तारखेला एशियान परिषदेसाठी जात आहेत. यासाठीही कागदपत्रांवर अधिकृतपणे प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे मोदी सरकार इंडिया नावाला पूर्णपणे वगळण्याच्या इराद्यात असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. यापुढे इंडियाचा त्याग करुन भारत असा उल्लेख सर्वत्र दिसणार आहे.
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात इंडिया नाव बदलून केवळ भारत करण्याचा सरकारचा इरादा असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात संसदेमध्ये विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या नाव बदलावर टीका केली असली, तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘भारतमाता की जय’ हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती, असं ते म्हणाले.