कोल्हापूर : कोल्हापुरातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी अचानक उमेदवारी मागे घेऊन सतेज पाटलांना मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यातून सतेज पाटील सावरलेले नाहीत. कार्यकर्त्यांच्या गराड्यात सतेज पाटील यांना रडू कोसळले. ही घटना माझ्या करिअरच्या दृष्टीने देखील परिणाम करणारी असेल, असे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले आहे.
भुदरगड तालुक्यात राहुल देसाईंचा प्रवेश होता. त्यांना सहा महिने सांगत होतो की आमच्याकडे या. त्यांनी ५-६ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा बोलविला होता. यामुळे आजच्या घडलेल्या घटनेनंतर तिकडे न जाऊन चालणार नव्हते. देसाईंना नाऊमेद करून चालणार नव्हते. मी येताना म्हटले की मला काय होईल माहिती नाही, कारण मी रडलेलो नाही, असे सतेज पाटील म्हणाले.
जे काही घडले ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे. मी त्यावर आज टीका करणार नाही. त्याला समोरे जायचे सामर्थ्य तुम्ही मला द्यावे. अनेक संकटे आयुष्यात आली. नेहमी तुमच्यासारखी जिवाभावाची माणसे हीच माझी ताकद राहिलीय. २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला, त्यांनी माघार घेण्याचे सांगितले. मी त्यांना म्हटले की असे करू नका, एकाला दिलेली उमेदवारी माघार घेऊन तुम्हाला उमेदवारी दिली. कसली काळजी करू नका. तुम्हाला काही झाले तर जबाबदार बंटी पाटील असेल. मी निघालो. ती स्थिती माझ्या हातात नव्हती. मी त्यांचा हात धरून थांबविणे हे उचित नव्हते. माझ्या हातून, तोंडून काही वाक्य जाऊ नये म्हणून मला काहींनी तुम्ही निघा असे सांगितले. म्हणून मी तिथून निघालो असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
सर्व गोष्टी घेऊन या गोष्टी घडल्या. का घडले, काय घडले याची कल्पना नाही. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. चुकीचे काही बोलणार नाही. जे आलेय त्याला सामोरे जायचे. मला राज्यातून, देशातून फोन येत आहेत. तू एवढा सक्षम असून असे काय झाले, असे विचारले गेले, असे सतेज पाटील म्हणाले. मला एक दिवस द्या, मी देखील माणूस आहे. उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. परंतू मला काँग्रेस म्हणून जावे लागेल.