कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वच भागात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडला असून त्यामुळे पंचगंगेची पाणी इशारापातळी जवळ आली आहे. आधीच पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेचे पाणी काल सायंकाळी सहाच्या सुमारास गायकवाड पुतळ्याच्या रस्त्यावर आले.
राजाराम बंधाऱ्यावर रात्री १० वाजता नदीची पाणीपातळी ३६.७ फूट इतकी होती. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. दरम्यान, राधानगरी धरण ७० टक्के भरले असून, धरणातून वीजनिर्मितीसह एकूण १३५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विविध ठिकाणीचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. बुधवार (ता. २६) पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
उशिरा आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुवांधार पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर मांडुकली येथे रस्त्यावर रात्री नऊ वाजता पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती.
ही वाहतूक कळे, मल्हारपेठ, गवशी, गारीवडे मार्गानी सुरू ठेवण्यात आली. इचलकरंजी येथील जुना पूल पाण्याखाली गेला असून करवीर तालुक्यातील कसबा बीड- महे येथील पालावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कडवी, शाळी, तुळशी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन दलाने शनिवारी रात्री उशिरा सुतारमळा येथील नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि गरज पडल्यास स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले.