नवी दिल्ली : इंडियन नेव्हीच्या लोगोमध्ये बदल केल्यानंतर आता इंग्रजांच्या काळापासून सुरु असलेली आणखी एक प्रथा नौदलानं मोडीत काढली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर नौदलानं तात्काळ ही प्रथा बंद केली आहे. नौदलाच्या जवानांद्वारे हातात बॅटन घेऊन जाण्याची प्रथा आता कायमची बंद करण्यात आली आहे.
भारतीय नौदलानं या निर्णयाबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं की, “इंग्रजांच्या काळात असलेल्या रॉयल इंडियन नेव्हीमध्ये नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धनौकेवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना हातात बॅटन घेऊन जाण्याची प्रथा होती. ही प्रथा भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ७५ वर्षे कायम राहिली, हा जणू एक नियमचं बनला होता.
“अशा पद्धतीनं नौदलाच्या जवानांनी हतात बॅटन घेऊन जाणं हे इंग्रजांच्या अधिकार क्षेत्राचं प्रतिक मानलं जात होतं. हा वसाहतवादाचा वारसा आम्ही भारताच्या अमृतकालात आम्ही बंद करत आहोत. प्रोव्होस्टसह सर्व कर्मचार्यांकडून अशा प्रकारे बॅटन वाहून नेणं तात्काळ प्रभावानं बंद करण्यात यावं,” असं नौदलाच्या पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर ही प्रथा बंद झाली असली तरी प्रत्येक युनिटच्या प्रमुखाच्या कार्यालयात एक औपचारिक बॅटन ठेवला जाईल, असंही नौदलानं स्पष्ट केलं आहे.
भारतीय संरक्षण दलांनी वसाहत काळापासून चालत आलेली अनेक वारसा पद्धती मोडून काढण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्यानुसार भारतीय नौदलानं आपलं चिन्हही बदललं आहे. भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी करण्यात आलं होतं.
शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या पार्श्वभूमीवर नौदलाचं नवं चिन्हं शिवमुद्रेच्या आकारामध्ये नौदलाचा अँकर आणि त्यावर भारताची राजमुद्रा तसेच तळाला नौदलाचं ब्रीदवाक्य ‘शं नो वरुण’ असं नवं चिन्ह बनवण्यात आलं आहे.