बेळगाव :जीवनाला कंटाळून नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वृद्धाचा जीव दोघा युवकांनी प्रसंगावधान राखून वाचविल्याची घटना आज सोमवारी सकाळी 11:45 ते 12 वाजण्याच्या सुमारास उचगाव नजीकच्या मार्कंडेय नदी पुलावर घडली.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचे नांव तुकाराम कल्लाप्पा पाटील (वय अंदाजे 75) असे असून ते गांधीनगर बेळगाव येथील रहिवासी असल्याचे समजते.
याबाबतची माहिती अशी की, बहुदा घरात न सांगता बाहेर पडलेले तुकाराम पाटील हे आज सकाळी उचगाव जवळील मार्कंडेय नदीच्या पुलाजवळ असलेल्या श्री गणेश मंदिराच्या ठिकाणी बसले होते. त्यानंतर अचानक उठून नदी पुलावरील रेलिंग वरून त्यांनी नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून जात असलेल्या विशाल हंडे (रा. उचगाव) आणि यतेश हेब्बाळ (रा. अतवाड) या दोन युवकांनी प्रसंगावधान राखून चपळाईने तुकाराम पाटील यांना आत्महत्या करण्यापासून रोखले.
तसेच हे काय करताय? म्हणून विचारणा केली असता “मी मरण्यासाठी इथे आलो आहे” असे त्यांनी सांगितले. तेंव्हा युवकांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुलापासून थोड्या दुरवर असलेल्या बेंचवर नेऊन बसवत विचारपूस केली. वयोवृद्ध तुकाराम पाटील हे पूर्वी खडीमशीनवर काम करत होते.
घटनास्थळी त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या खडीमशीनवर काम करणाऱ्या एकाने तुकाराम यांना ओळखले आणि त्याने त्यांच्या कुटुंबीयांचा फोन नंबर दिला. त्या नंबरवर विशाल व यश यांनी संपर्क साधून त्यांच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली.
वयोवृद्ध तुकाराम पाटील यांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल विशाल हंडे आणि यतेश हेब्बाळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांकडून कौतुक होत होते.