पणजी : भाजपची दादागीरी आता गोव्यात पुन्हा सुरू झाली असुन, भाजपचे गुंड आता भाजपचे उमेदवार पराभुत झालेल्या मतदारसंघात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता दमदाटी करीत आहेत. दुर्देवाने पोलीस नागरीकांना संरक्षण देण्या ऐवजी भाजपच्या गुंडांची पाठराखण करीत आहेत असा आरोप कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
गोव्याचे टेंपररी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे चिखली इस्पितळात राजकीय आजाराने दाखल झालेल्या एका तथाकथीत रुग्णांची विचारपुस करण्यासाठी जाऊन राजकीय नाटक करतात असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. इंद्रदेव शुक्ला यांनी राजकीय दबावाला बळी न पडता, काल होळी साजरी करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या भाजपच्या गुंडाना आळाबंद घालावा. चिखली इस्पितळात दाखल झालेल्यानेच आमच्या एका कार्यकर्त्यावर वाहन घालण्याचा काल प्रयत्न केला. लोकांवर वाहने चढविण्याची भाजपची संस्कृती आहे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार आता वैफल्यग्रस्त झाले असुन, आपणांस पाठींबा न दिलेल्यांवर सुड उगविण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. केपें, कुंकळ्ळी, साळीगांव तसेच कुडतरी व इतर मतदारसंघात त्यांनी सुडाचे व दादागीरीचे वातावरण तयार केले आहे. हे प्रकार सुरूच राहिल्यास कॉंग्रेस कार्यकर्ते बघ्याची भुमीका घेणार नसुन, पोलीस महासंचालकांनी याची वेळीच दखल घ्यावी व नागरीकांना संरक्षण द्यावे अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.