DelhiAjitPawar Sharad Pawar Meet: गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार व शरद पवार एकमेकांपासून दुरावल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला मिळालं. या पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची सरशी झाली, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बाजी मारली. विधानसभा निवडणूक निकालांनंतर पहिल्यांदाच आज अजित पवार व शरद पवार यांची भेट झाली. या भेटीतून अनेक राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असतानाच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
विधानसभा निवडणूक निकालांनंतर अजित पवार व शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार व त्यांच्या पक्षावर परखड टीका करणाऱ्या अजित पवारांनी व त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मात्र ही गोष्ट करणं टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे दोन्ही दिग्गज पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यात युगेंद्र पवार यांनी केलेल्या विधानामुळे त्यात अधिक भर पडली आहे.
दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट
शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी आज सहकुटुंब दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार व पक्षातील इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामुळे या भेटीतून राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात युगेंद्र पवारांनी भेटीनंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात सूचक विधान केलं आहे.
युगेंद्र पवार यांनी आपण दरवर्षी वाढदिवशी शरद पवार जिथे असतील तिथे त्यांची भेट घेण्यासाठी जातो, असं सांगितलं. मात्र, त्याचवेळी अजित पवार तिथे येतील हे आपल्याला माहिती नव्हतं, असंही ते म्हणाले. “अजित पवार येणार होते हे मला माहिती नव्हतं. आमच्या कुटुंबानं नेहमीच कौटुंबिक संबंध वेगळे ठेवले आहेत. शरद पवारांचा ८५ वा वाढदिवस असल्यामुळे जाऊन भेटलं पाहिजे या भावनेने ते आले असतील”, असं युगेंद्र पवार म्हणाले.
आधी टीका, आता भेटीगाठी?
दरम्यान, इतक्या टीकेनंतर आता भेटीगाठी होत असल्याबाबत विचारणा केली असता एवढ्या मोठ्या प्रमाणावर टीका वगैरे झाली नसल्याचं युगेंद्र पवार म्हणाले. “एकतर एवढी मोठी टीका वगैरे दोन्ही बाजूंनी झाली नाही. कुणीही निवडणुकीत पातळी सोडलेली नाही. आमचं कुटुंब कधी तसं वागत नाही. शेवटी राजकारण एका बाजूला असलं पाहिजे, विचार वेगळे असले पाहिजेत. आता ते वेगळे झालेत.पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत. असाच आजचा हा प्रयत्न असेल”, असं त्यांनी नमूद केलं.
तसेच, “दोघांनी एकत्र यावं यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना असतील. पण त्याबाबत मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील”, असं युगेंद्र पवार म्हणाले. त्याचवेळी, “या भेटीकडे १०० टक्के कौटुंबिक दृष्टीकोनातूनच पाहावं”, असं सांगायलाही युगेंद्र पवार विसरले नाहीत.