आम्हाला पुन्हा संधी द्या, लोकांना विनंती करणार. मागच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक नरेटीव्ही सेट केलेलं. संविधान बदलणार आरक्षण काढणार, असं नेरटीव्ह सेट करुन लोकांची दिशाभूल केली. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागली” असं अजित पवार म्हणाले. नाशिकमधून आजपासून अजित पवार यांच्या पक्षाची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेसाठी सगळं कॅम्पन गुलाबी रंगात आहे. स्वत: अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान केलं आहे. “लोकसभेला जे झालं, तस विधानसभेला होऊ नये. कुठलही नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची योग्य माहिती देणार. त्यासाठी जनसन्मान यात्रा सुरु केलीय” असं अजित पवार म्हणाले.
विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेले, ते राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटले, तिथे इंडिया आघाडीची बैठक झाली. यावर अजित पवार म्हणाले की, तो त्यांचा अधिकार आहे. “महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना आहे. प्रत्येकजण आपल्या बाजूने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार” दिल्ली-महाराष्ट्रासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “मला यावर काही बोलायचं नाही. लोक सगळं बघतायत. मी जे करतो, ते बोलतो, दुसरं काही बोलण्याची गरज नाही. दुसऱ्यांवर आरोप करण्याची गरज नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते करतील, आम्हाला जे योग्य वाटणार ते करणार”
“जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचण्याचा प्रयत्न करणार. महायुती सरकारने जे निर्णय घेतलेत, ज्या योजना सुरु केल्यात, त्याची शेतकऱ्यांना, बहिणींना माहिती देणार” असं अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयावर सुद्धा अजित पवार बोलले. महाविकास आघाडी मराठा आरक्षणा संदर्भात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “त्यांना जी भूमिका मांडायचीय ते मांडू शकतात. आम्हाला कोणालाही नाराज करायच नाहीय. समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जायच आहे” “मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रत्येकाला जे योग्य वाटतं ते भूमिका मांडतात. अनेकदा सभागृहात एकमताने यावर निर्णय झालेत. राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय. वेळोवेळी निर्णय घेतलेत. परंतु काही निर्णय हाय कोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाहीत”
विधानसभेसाठी जागा वाटपाच्या मुद्यावर सुद्धा अजित पवार यांनी माहिती दिली. “सीट शेअरींगमध्ये सध्या ज्या जागा आमच्या तिन्ही पक्षांकडे आहेत, त्या तशाच ठेवल्या जातील. पण जर काही विद्यमान जागा बदलायच्या असतील, तर त्याची मानसिक तयारी तिन्ही पक्षांनी केली आहे. आता त्याला लवकर अंतिम स्वरुप दिलं जाईल”