बेळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जाहीर केलेल्या दसरा सणाच्या सुट्टीचा कालावधी आज समाप्त झाला असून आजपासून शाळांच्या यंदाच्या दुसऱ्या सत्रातील शैक्षणिक पर्वाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शहर उपनगरातील सर्व शाळा पुन्हा विद्यार्थी -विद्यार्थिनींनी गजबजून गेला आहेत.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने यंदा 3 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत दसऱ्याची सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आता आज सोमवारी 21 ऑक्टोबरपासून बेळगाव शहरासह राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. थोडक्यात यंदाच्या शालेय शैक्षणिक वर्षाचे दुसरे पर्व आजपासून प्रारंभ होत असून त्या अनुषंगाने सर्व शैक्षणिक संस्थांनी शाळेची स्वच्छता वगैरे आवश्यक ती पूर्वतयारी केली आहे.
दसऱ्याच्या सुट्टीनंतर म्हणजे 18 दिवसानंतर शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थीवर्गामध्ये देखील उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज सकाळी विविध शाळा परिसरातील रस्ते पुन्हा गणवेशातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी फुलून गेलेले दिसत आले . शाळा पुन्हा मुलामुलींनी गजबजून निघाली आहे.
दरम्यान सर्व शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या पर्वाची पूर्वतयारी केली असून कांही संस्था नजीकच्या परीक्षांसाठी तयारी करत आहेत, तर कांही संस्था शालेय कामकाजात सहजता आणण्याच्या प्रयत्नात आहेत.