कोल्हापूर: उमेदवार माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात सर्वाधिक चर्चा झाली ती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी माघारीची होय. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर मोठा तमाशा झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेली संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण राज्यात व्हायरल होत आहे. अशात आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेससह सतेज पाटलांवर हल्ला चढवला.
आधी जाहीर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करणे, नवा उमेदवार जाहीर करणे आणि मग अधिकृत उमेदवारानेच अर्ज मागे घेणे यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारण तापले असताना आता धनंजय महाडिकांनी त्यात उडी घेतली आहे. सोमवारी झालेल्या प्रकारावर त्यांनी थेट सतेज पाटलांना दोषी ठरवले. त्यांच्या घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. सुरुवातीला राजेश लाटकरांना उमेदवारी जाहीर करून नंतर कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी केलेल्या विरोधामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की सतेज पाटलांवर आली.
उमेदवारीसाठी त्यांना थेट राजवाड्यावर जावे लागले. सतेज पाटलांची पहिली पसंती राजू लाटकरांना होती तर दुसरी पसंती मधुरिमाराजे यांना होती. याचा अर्थ हा छत्रपती घराण्याचा अवमान आहे. राजकारणासाठी या व्यक्तीने राजघराण्याचा कशा पद्धतीने वापर केला हे या सर्व प्रकरणातून दिसते, असा आरोप महाडिकांनी केला.
लाटकरांची उमेदवारी मागे घेण्यात पाटलांना यश आले नाही ती त्यांची तिसरी नामुष्की होती. शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊन उमेदवारी मागे घेतली. ही घटना काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच झाले. सहा महिन्यांपूर्वी गादीचा मान, गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागितले जात होते आणि आज महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्वाच्या भाषेत बोलले गेले. सतेज पाटील एवढे मोठे झाले का की ते आता राजघराण्यावर बोलू लागलेत असा सवालही महाडिकांनी उपस्थित केला.
आज उत्तरेत झालेल्या घटनेचाचा परिणाम कोल्हापूर दक्षिण, करवीर, शिरोळ, हातकणंगले या मतदारसंघात होणार आणि येथील काँग्रेसच्या पाचही उमेदवारांचा सुफडा साफ होणार असा इशारा यावेळी महाडिकांनी दिला. कोल्हापूरात दहा विरुद्ध शून्य असा निकाल लागणार असेही ते म्हणाले.