जांबोटी : गेल्या काही वर्षात जांबोटी ( ता. खानापूर) परिसरात अवैध धंदे, फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने जांबोटी बस स्थानकासह हद्दीतील प्रत्येक गावातील मुख्य चौकात सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चोरी व अवैध धंद्याना चाप बसणार आहे.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टहोळी यांच्या हस्ते नुकतेच या कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी अध्यक्षा लक्ष्मी तळवार, उपाध्यक्ष सुनील देसाई, सदस्य अशोक सुतार, प्रविणा साबळे, मयुरी सुतार, लक्ष्मी मादार, पीडीओ प्रकाश कुडची यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जांबोटी बस स्थानकावर मोठा फिरता कॅमेरा बसवण्यात आला आहे , तो बस स्थानकासह लगतच्या परिसरातील चित्रण करेल. त्याशिवाय खानापूर- बेळगाव फाटयावर एक कॅमेरा बसवला आहे. याशिवाय पंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील मुख्य चौकात एक कॅमेरा बसवला आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी बस स्थानकावरील केव्ही जी बँकेत चोरीचा प्रकार घडला होता. तत्पूर्वी, दोनवेळा दुकान फोडीचे प्रकार झाले होते. तसेच दोनदा लगतच्या गावातही असे प्रकार घडले आहेत. मात्र, आता कॅमेऱ्यामुळे या सर्व प्रकारांना आळा बसेल तसेच स्थानकात होणाऱ्या अवैध धंद्यांवरही नजर राहणार असून पोलिसांनाही शोध कार्यात मदत होणार आहे, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
कॅमेरे बसवून ग्राम पंचायतीने एक चांगले काम केले आहे. त्यामुळे लोकांसह आम्हांलाही फायदा होणार आहे. अवैध वाहने तसेच चोरीचा शोध लावण्यास मदत होईल. अलीकडे या कॅमेर्या द्वारे एका व्यक्तीचा शोध घेण्यास मदत झाली आहे असे जांबोटी सहायक पोलिस उपनिरीक्षक बडीगेर यांनी सांगितले.