बेळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठत सध्या तिरंगा ध्वज आणि देशभक्तीपर विविध वस्तू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. ठीक ठिकाणी दुकानांमध्ये तिरंगा ध्वज आणि स्वातंत्र्य दिनाची संबंधित साहित्याची विक्री होत असल्यामुळे बाजारपेठेत देशभक्तीपर वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
स्वातंत्र्य दिन अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्यामुळे शहरातील संबंधित दुकानदारांनी तिरंगा ध्वजासह विविध देशभक्तीपर वस्तूंनी आपली दुकाने सजवली आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनं आणि घरांवर लावण्यासाठी असणाऱ्या तिरंगा ध्वजासह देशभक्तीपर संदेश देणारे बॅच, स्टिकर, ब्रेसलेट, ‘आय लव इंडिया’ लिहिलेले तिरंगी शेले, छातीवर लावण्याचे तिरंगी ध्वजाचे गोल, आयताकार ब्रोचर्स वगैरे स्वातंत्र्य दिनाशी संबंधित विविध वस्तूंची बाजारपेठेत रेलचेल पहावयास मिळत आहे.
स्वातंत्र्य दिन तोंडावर आल्यामुळे तिरंगा ध्वजासह उपरोक्त साहित्याच्या खरेदीसाठी बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. यंदा प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. परिणामी किंमत जास्त असली तरी कापडी तिरंगा ध्वजांची मागणी वाढली आहे.
बेळगाव लाईव्हला माहिती देताना डी. के. आर्ट्स दुकानाचे मालक गजानन महादेव कावळे यांनी सांगितले की, सध्या बाजारात तिरंगा ध्वजांची मागणी वाढली आहे. मात्र प्लास्टिकच्या ध्वजांवर बंदी असल्यामुळे लहान मोठ्या आकाराच्या कापडी तिरंगा ध्वजांची कमतरता निर्माण झाली आहे. याला कारण हाताने शिवल्या जाणाऱ्या कापडी तिरंगा ध्वजांच्या तुलनेत प्लास्टिक ध्वजांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ असे आवाहन केल्यामुळे तर तिरंगा ध्वजांची मागणी आणखीनच वाढली आहे.
तिरंगा ध्वजांचे दर सांगायचे झाल्यास छोट्या प्लास्टिकच्या ध्वजाची किंमत तीन रुपये असेल तर त्याचा आकाराच्या कापडी ध्वजाची किंमत दहा रुपये आहे. आमच्याकडे किमान दहा रुपयांपासून ते कमाल 220 रुपयांपर्यंतचे कापडी तिरंगी ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यावर्षी आम्ही ध्वजवंदनासाठी वापरला जाणारा तिरंगा ध्वज खास तयार करून घेतला आहे. अस्सल कॉटनच्या पातळ कपड्यापासून बनवलेला हा ध्वज आमच्याकडे फक्त 220 रुपयाला उपलब्ध आहे, असे सांगून सर्वसामान्यपणे अशा ध्वजासाठी 800 ते 1000 रुपये मोजावे लागतात, असे गजानन कावळे यांनी स्पष्ट केले.