नवी दिल्ली : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा-झांज पथकातील सदस्यांची संख्या मर्यादित करणाऱ्या एनजीटीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळातील ढोल + ताशा + झांज सदस्यांची एकूण संख्या ३० पेक्षा जास्त नसावी या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (पश्चिम झोन) खंडपीठाने दिलेल्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एनजीटीच्या निर्देशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस जारी करताना अंतरिम आदेश दिला. ढोलताशा पथक हे पुणेकरांचे ह्रदय आहे, त्यामुळे त्यांना ते वाजवू द्या, असे सुनावणीवेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
१७ स्प्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे, त्यामुळे हे प्रकरण लवकर निकाली काढण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी घेऊन निर्णय दिला. याचिकाकर्त्याचे वकील अमित पै म्हणाले की, पुण्यासाठी गणेशोत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व आहे. गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एनजीटीने जारी केलेल्या इतर निर्देशांमुळे अपीलकर्ते नाराज नाहीत. मात्र, ढोल-ताशा पथकामध्ये मर्यादीत संख्या असण्याला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.