मुंबई : सातत्याने चढ-उतार होणाऱ्या कांद्याच्या किमतीने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर लसणाच्या दरानेही विक्रमी स्तर गाठण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ऐन थंडीत चटकदार पदार्थांचे बेत खर्चिक होऊ लागले आहेत.
कांद्याचे दर सातत्याने कमी-जास्त होत असतात. यंदा मात्र ते मुंबईतील किरकोळ बाजारांत पावसाळ्यापासून 35 ते 40 रुपये किलोदरम्यान स्थिर होते. मात्र, मागील काही दिवसांत किमतीत अचानक दरवाढ सुरू झाली व आता काही ठिकाणी कांद्याने शंभरी आकडा गाठला आहे. ‘ सध्या थंडी पडू लागल्याने अधिक तिखट व चटकदार खाद्यपर्थांची मागणी वाढली आहे. हॉटेल व रेस्टॉरंटमध्येही वाढती मागणी दिसून येत आहे. परिणामी त्या क्षेत्राकडून व एकूणच कांद्याची मागणी 15 ते 20 टक्के मागील दोन आठडव्यात वाढल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी कांदा 70 ते 80 रुपये किलो होता तो आता 100 रुपये किलोच्या घरात गेला आहे’, असे परिसरातील भाजी विक्रेते सांगत आहेत.
कांद्याचे हे दर विविध ठिकाणी वेगवेगळे आहेत तर दुसरीकडे लसणाच्या दरांनीही सर्वसामान्यांना हैराण केले आहे. पावसाळ्यादरम्यान 60 ते 70 रुपये प्रति पाव किलो असलेले लसूण नवरात्रातील उपवासांचा कालावधी संपताच 80 मग 100, 120रुपये पाव किलोवरुन आता 150 रुपये प्रति पाव किलो कडे जात आहेत.
या क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांनुसार, वास्तवात दरवर्षी कांद्याचा साठा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान काहिसा महाग होताना दिसतोच. दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात आला की, दर हळूहळू कमी होऊ लागतात. यंदा मात्र नवीन कांदा संथ गतीने बाजारात येत आहे. त्यामुळे एकूण मागणीच्या 80 टक्के मालच बाजारात येत आहे. त्यामुळे किमती वधारल्या आहेत. नाशिक पट्ट्यातून येणारा लसणाचा नवा माल येण्यास विलंब झाल्याने अफगाणिस्तानातील आयातीत लसूण काही प्रमाणात मागवावा लागत आहे. तो किरकोळ बाजारात 50 रुपये किलोदरम्यान आहे. त्यामुळेच दरवाढ झालेली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.