मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन दिवस मौन बाळगलं. या कालावधीत शिवसेनेच्या आमदार, खासदार, नेत्यांनी मुख्यमंत्रिपदी शिंदेच राहावेत, अशी मागणी लावून धरली. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले. शिंदे २ दिवस माध्यमांशी बोलले नाहीत. त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. या कालावधीत शिंदेंनी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली.
शिंदेंनी काल मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. त्यानंतर आता त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता वाढली आहे. यासोबतच भाजप महाराष्ट्रातील त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांना केंद्रात मंत्रिपदं देणार आहे. एबीपी माझानं सुत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक-एक मंत्रालय देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल, लोकसभेचे खासदार सुनील तटकरेंच्या नावाची चर्चा आहे. या दोघांपैकी एकाला मंत्रिपदं मिळू शकतं.
लोकसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात केवळ १७ जागा जिंकल्या. केंद्रात सत्ता स्थापनेसाठी नरेंद्र मोदींना पहिल्यांदाच मित्रपक्षांची गरज भासली. त्यावेळी सात जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला १ राज्यमंत्रिपद स्वतंत्र प्रभारासह देण्यात आलं. प्रतापराव जाधव यांना आयुष आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. आता शिवसेनेला एक कॅबिनेट खातही देण्यात येईल.
राष्ट्रवादीला लोकसभेत केवळ १ जागा मिळाली. त्यांना भाजपनं राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांना मंत्रिपदं दिलं जाणार होतं. पण याआधी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेल्या पटेलांना राज्यमंत्रिपद नको अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली. ज्यावेळी कॅबिनेट मिळेल, तेव्हा आम्ही निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीनं तेव्हा सांगितलं होतं. त्यामुळे आता पटेल यांचं नाव निश्चित मानलं जात आहे.
राज्यात शिवसेना १२ पेक्षा अधिक मंत्रिपदांसाठी आग्रही आहे. मुख्यमंत्रिपदाचा त्याग, शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीला मिळालेलं यश आणि २ दिवसांत शिंदेंनी मिळवलेली बार्गेनिंग पॉवर पाहता शिवसेनेला राज्यात महत्त्वाची खाती मिळू शकतात. शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला शह देणं त्यांना सोपं गेलं. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद नसेल. त्यामुळे ठाकरेसेना डोकं वर काढण्याची शक्यता आहे. ते विचारात घेता शिंदेंना महत्त्वाची खाती दिली जाऊ शकतात. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेला बळ दिलं जाऊ शकतं.