बेळगाव : चिक्कोडी (जि. बेळगाव) तालुक्यातील मांजरी गावाजवळ कृष्णा नदीवर लघू पाटबंधारे विभागाने 6.50 कोटी रुपये खर्चून नुकताच बांधलेला मांजरी-बावनसौंदत्ती पूल-कम-बॅरेज उद्घाटनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच कोसळून नदीत वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाकडे अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच हे घडले असल्याचा आरोप केला जात आहे.
नदीच्या जोरदार प्रवाहाने मांजरी-बावनसौंदत्ती पूल-कम-बॅरेज वाहून गेल्यामुळे रायबाग, चिंचली, कुडची, दिग्गेवाडी सारख्या इतर सीमावर्ती गावांसाठी संपर्क सुधारण्याच्या उद्देशाने बांधलेला हा पूल आता पूर्णपणे निरुपयोगी झाला आहे.
वाहतूक सुरळीत करणाऱ्या या प्रकल्पाचे प्रारंभी स्वागत करणारे शेतकरी आता खर्च केलेले 6.50 कोटी रुपये पाण्यात गेल्याने निराश झाले आहेत. बंधारा म्हणून काम करणाऱ्या या पुलाचा उद्देश शेतकरी आणि कामगारांना विविध गावांना जोडून आणि मिरज, इंगळी आणि यडूर या ठिकाणांदरम्यानचा प्रवास सुलभ करण्यासाठी होता. मात्र तो कोसळल्याने स्थानिकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूल कोसळून प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गायोगोळ यांनी संपर्क पूर्ववत करण्यासाठी पुलाची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचा मांजरी-बावनसौंदत्ती पूल-कम-बॅरेज बांधणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
दरम्यान, बाधित गावांसाठी महत्त्वाचा दुवा असलेला सदर पूल पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल, असे आश्वासन अथणी येथील लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बी. एस. लमाणी यांनी दिले आहे.