Ad imageAd image

मुंबई- बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ratnakar
मुंबई- बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राजधानी मुंबई तील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची माहिती असून आगीचे वृत्त समजताच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन थांबवण्यात आले आहेत. त्यानंतर, मेट्रो स्टेशनमधील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे. सुमारे 40 ते 50 फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे स्टेशनबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली असून अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, बीकेसी मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली असल्याने आग पसरली असती तर वित्तहानी होण्याचा मोठा धोका होता. लाकडाच्या साठ्याला आग लागल्यानंतर धुराचे प्रचंड लोट मेट्रो स्थानकाच्या परिसरात पसरले. त्यावेळी सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. ही आग विझवण्यसाठी घटनास्थळी अग्निशामन दलाच्या 12 ते 13 गाड्या दाखल झाल्याने याठिकाणी रस्ते वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. सध्या ही आग आटोक्यात आणल्याची माहिती असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मात्र, आता अंडरग्राऊंड मेट्रोची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागणार, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article