Ad imageAd image

घड्याळ चिन्ह वापरताना ‘न्यायप्रविष्ठ’ उल्लेख नको; सूचनांचे पालन करा अन्यथा… सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला तंबी

ratnakar
घड्याळ चिन्ह वापरताना ‘न्यायप्रविष्ठ’ उल्लेख नको; सूचनांचे पालन करा अन्यथा… सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला तंबी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख केला जात नसल्याने शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच आता न्यायालयाने दोन्ही गटांना खडसावले आहे. आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करा, अन्यथा आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू असा जणू इशाराच न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे दोन्ही गटाला निवडणुकीदरम्यान सावध पाऊलं टाकावी लागणार आहेत.

मात्र अजित पवार गटाने आपण सर्व सूचनांचे पालन करत असल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू असे आश्वासन न्यायालयात दिले आहे. तरी शरद पवार गटाकडून तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, घड्याळ हे चिन्ह दोघांपैकी कोणालाही मिळू नये अशी आमची मागणी होती. मात्र तुम्ही १९ मार्च रोजी हे चिन्ह बहाल करताना काही अटी घातल्या होत्या. त्या अटींचे पालन अजित पवार गटाकडून केले जात नाही. तसेच शरद पवार यांच्या नावाचाही वापर होऊ नये असा आदेश होता. मात्र, घड्याळ हे चिन्ह अजूनही शरद पवार या नावाशी जोडले गेले आहे, याकडे मनु सिंघवी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

तसेच अभिषेक मनु सिंघवीं यांनी पुढे म्हटले की, जे चिन्ह कोर्टाच्या विचाराधीन आहे तेव्हा त्याचा फायदा दोघांपैकी एकाला व्हायला नको, हे चिन्ह पक्ष फुटीपूर्वीचे आहे. या निरीक्षणांच्या आधारेच न्यायालयाने चिन्हाचा वापर करताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सर्वत्र लिहिण्यात यावे, असे आदेश दिले होते. मात्र त्याचे पालन होत नाही. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून अजित पवारांच्या वकीलांना विचारणा करण्यात आली. तुम्ही नियमांचे पालन करत नाही का? असा खडसा सवाल न्यायालयाने विचारला. यावर आम्ही नियमानुसार चिन्ह वापरत आहोत असे अजित पवार गटाचे वकील बलवीर सिंग यांच्याकडून सांगण्यात आले. तर सगळे फोटो शरद पवार पक्षाकडून दाखवले जात नाहीत, असा दावा सुद्धा बलबीर सिंग यांनी केला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाच्या या वादावरुन दोन्ही गटाला खडसावले आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करा, नाहीतर आम्ही अवमानाचा ठपका ठेवू, असा इशारा ही न्यायालयाने दिला आहे. तुम्ही दोघांनी तुम्हाला दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. जर मुद्दाम निर्देशांचे उल्लंघन कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू, असेही न्यायालय म्हणाले. यानंतर अजित पवार गटाकडून त्वरित ‘आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू,’ असे आश्वासन देण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article