Ad imageAd image

भाजपला ‘शांतीत क्रांती’ करण्याची गरज ; निसटलेली निवडणूक जिंकून देणारा ‘हरियाणा पॅटर्न’ राज्यात ऍक्टिव्ह

ratnakar
भाजपला ‘शांतीत क्रांती’ करण्याची गरज ; निसटलेली निवडणूक जिंकून देणारा ‘हरियाणा पॅटर्न’ राज्यात ऍक्टिव्ह
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई: लोकसभा निवडणूक सुरु असताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेलं विधान गाजलं आहे . आधी भाजप कमकुवत होता. तेव्हा संघाची गरज भासायची. आता भाजप सक्षम आहे. तो स्वबळावर चालतो, असं नड्डा म्हणाले. त्यानंतर संघानं लोकसभा निवडणुकीतून अंग काढून घेतलं. २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा २४० जागांवर समाधान मानावं लागलं. त्यात संघाची निष्क्रियता हे महत्त्वाचं कारण ठरलं. हरियाणात मात्र संघ सक्रिय झाला आणि भाजपनं जवळपास हातातून निसटलेली निवडणूक जिंकली. आता महाराष्ट्रातही याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस आहे.

हरयाणात सगळेच सर्व्हे भाजपच्या विरोधात होते. काँग्रेसची सत्ता येणार असा सगळ्यांचा अंदाज होता. त्यामुळे काँग्रेसचे नेते काहीसे निष्क्रिय राहिले. हाच फाजील आत्मविश्वास त्यांना नडला. हरियाणा हातातून जात असल्याचं लक्षात येताच भाजप आणि संघ प्रचंड सक्रिय झाले. निवडणुकी आधीच्या दोन महिन्यांत संघाचे स्वयंसेवक प्रचंड राबले. या कालावधीत २० हजार लहान बैठका घेण्यात आल्या. या प्रत्येक बैठकीला ८ ते १५ जण उपस्थित असायचे.

महाराष्ट्रातील परिस्थिती भाजपसाठी प्रतिकूल आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपविरोधातील रोष दाखवून दिला आहे. त्यामुळ महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हातातून निसटेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संघ हरियाणात सुपरहिट ठरलेला बैठकांचा पॅटर्न महाराष्ट्रात वापरणार आहे. संघ महाराष्ट्रात तब्बल ६० हजार बैठका घेणार आहे.

हरियाणात संघानं घेतलेल्या बैठकांमध्ये काँग्रेसचं जाट केंद्रित राजकारण, हुड्डांच्या कार्यकाळात जाटांना देण्यात आलेली ताकद, अग्निवीर योजनेतील समस्यांवरील उपाय, शेतकऱ्यांच्या अडचणी यावर चर्चा केली गेली. जनमत बदलण्याचं काम या बैठकांच्या माध्यमातून करण्यात आलं. कुंपणावर असलेल्या मतदारांना भाजपकडे ओढण्याची मोहिमच बैठकांमधून राबवण्यात आली. बंद दारांआड झालेल्या बैठकांमधून भाजपला जनभावनादेखील समजल्या असाव्यात असे वाटते .

संघ सक्रिय झाल्यामुळे भाजपची ताकद दुपटीनं वाढू शकते. सर्व्हे, ट्रेंड्स, डेटा ऍनालिटिक्स सारख्या आधुनिक गोष्टींचा वापर भाजपकडून निवडणुकीची तयारी करताना केला जातोय. पण संघाकडे असलेल्या स्वयंसेवकांच्या प्रचंड मोठ्या फळीमुळे भाजपला जनमताचा कानोसा थेट घेता येतो. स्वयंसेवक लोकांमध्ये असतात. त्यांच्यासोबत बैठका घेतात. त्यामुळे जनभावना नेमकी काय आहे, याचा धांडोळा भाजपला घेता येतो. त्यामुळेच हरियाणात भाजपनं निसटलेली निवडणूक जिंकली. आता तोच प्रयोग महाराष्ट्रात करण्याची संघाची मनीषा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article