मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सिद्दिकी यांच्यावर २ ते ३ राउंड फायर झाल्याची घटना बांद्रे पूर्व येथे घडली आहे. सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही .
झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिस बाहेर हा गोळीबार झाल्याचे समजते. या गोळीबारात बाबा सिद्दिकी हे गंभीर जखमी झाल्याचे कळते. खेरवाडी सिग्नल जवळ ही घटना घडल्याचे समजते. बाबा सिद्दिकींवर तिघांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे १९९९, २००४, २००९ असे सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री म्हणून काम केले होते. आमदार होण्याआधी सिद्दिकी हे १९९२ आणि १९९७ अशी दोन टर्म नगरसेवक होते. याच वर्षी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता.
त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी यांचे मुळ नाव झियाउद्दीन सिद्दिकी असे आहे. १९७७ साली अगदी लहान वयात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थी चळवळीमध्ये होते. ८० मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले तर चार वर्षांनी ते अध्यक्ष झाले. १९८८ साली ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची आठवण
राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याची मुंबईतील गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करताना गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता.