बेळगाव : बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात एजंटांचा धुमाकूळ सुरु असून या विरोधात आज बेळगावमध्ये वकील संघटनांच्या विरोधात आंदोलन छेडून उपनोंदणी कार्यालयालाच घेराव घालण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुरु आहे. याठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी विलंबाचे धोरण अवलंबण्यात येत असून एजंटांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
कमीतकमी वेळेत होणाऱ्या कामासाठीही आठवडाभराचा वेळ लावून सर्वसामान्य नागरिकांना अनेकवेळा कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जात आहेत.
सदर बाब अनेकवेळा उपनोंदणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अधिकृत बॉण्ड रायटर्सकडून अर्ज स्वीकारून बनावट कागदपत्रे देण्यात येत असल्याचीही बाब निदर्शनात आली असून सरकारी नियमांचे पालन करून एजंटांना आळा घालण्यात यावा, अन्यथा उपनोंदणी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला .
यावेळी बेळगाव वकील संघटनेचे ॲड वाय के दिवटे ऍड. विशाल पाटील, ऍड. अनिल पाटील, ऍड. श्रीधर मुतगेकर, ऍड. बागेवाडी, ऍड. सानिकोप, ऍड. पुजेरी, ऍड. विनायक आदी उपस्थित होते.