बेळगाव : शिवाजीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या समस्येचे भयंकर रूप शनिवारी दि. 28 ला समोर आले, जेव्हा शिवाजीनगर पहिली गल्ली पाचवा क्रॉस येथे घराबाहेर खेळणाऱ्या एका 7 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेत 7 वर्षांच्या मुलीला जखमी झाली असून तिला तत्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शिवाजीनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सातत्याने वाढत चालला आहे. रस्त्यावर कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याने नागरिकांना विशेषतः लहान मुलांना घराबाहेर सोडण्याची भीती वाटत आहे, परंतु याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही.
आता पर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. मुलांना शाळेत जाणे देखील कठीण झाले आहे. महापालिकेने तातडीने या समस्येवर उपाय योजना करावी आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
नागरिकांनी महापालिकेला आवाहन केले आहे की, त्यांनी या समस्येवर तात्काळ उपाय करावेत आणि परिसरात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून लोक शांतपणे आणि सुरक्षितपणे राहू शकतील.