बेळगाव : वाढदिवसासाठी अवाढव्य खर्च व पार्टी न करता तीच रक्कम एका मूत्रपिंड विकारग्रस्त गरजू रुग्णाच्या उपचारासाठी देऊन आज आपला वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे भान जुने गांधीनगर येथील कोमल पाटील यांनी राखले आहे.
जुने गांधीनगर येथील कोमल मारुती पाटील हे युवा व्यावसायिक असून शहरातील बसवान गल्ली येथील मराठा बॅंकेसमोरील नेत्रावती फार्मा डिस्ट्रीब्यूटर्सचे ते मालक आहेत.
गेल्या कांही वर्षापासून कोमल पाटील हे स्वतःचा वाढदिवस पार्टी वगैरे करून साजरा करण्याऐवजी जीवनातील हा महत्त्वाचा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून सामाजिक बांधिलकी जपतात. या अनुषंगाने मागील वर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त शांताई वृद्धाश्रम आणि गोशालेला मदत केली होती.
आता यंदा कोमल यांनी आज 28 सप्टेंबर या आपल्या वाढदिवशी मूत्रपिंडाच्या विकारानेग्रस्त, मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या कोनवाळ गल्ली येथील प्रशांत राजू हांडे या मुलाला उपचारासाठी 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.
याप्रसंगी सचिन चव्हाण, विश्वजीत चौगुले आदी उपस्थित होते. या पद्धतीने गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळे कोमल पाटील यांची सर्वत्र प्रशंसा होत असते.